मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे, काही महिला घटस्फोटित असल्यामुळे अशा एकल महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
का वाढवली सरकारने तारीख?
त्याअनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.
https://lbyadmin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लाडकी बहीणसाठी EKYC पूर्ण करू शकता. त्यामुळे ही वेळ चुकवू नका. मोबाईलनंबर आणि कॅप्चर कोड टाकून लॉगइन करा आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण करा. मुदतवाढ डिसेंबरपर्यंत केल्यामुळे आता जवळपास महिन्याचा अवधी आहे.
