लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात जीवनरेखा फाउंडेशन डी.एम.एल.टी. महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात धक्काबुक्की झाली होती.या धक्काबुक्कीचे पर्यावसन लाठ्या काठ्यांनी हाणामारीत झाले. ही घटना महाविद्यालयाच्या गेट बाहेर घडली होती. या मारहाणीत डीएमएलटी महाविद्यालयातील सुरज शिंदे या विद्यार्थ्याला काठीने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या सुरज शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर आरिफ गौस मियां शेख हा गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू आहेत.
advertisement
या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर इम्रान माजीद पटेल उर्फ पठाण, रेहान अल्लाउद्दीन शेख, रोशन माजिद पटेल, मुक्रम जमाल शेख, शहाबाद गफार शेख आणि प्रीतम उर्फ मोन्या दत्ता करंजीकर या सहा आरोपींना लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.आरोपींमध्ये दोन विद्यार्थी हे डी.एम.एल.टी. महाविद्यालयाचे आहे तर एक विद्यार्थी हा छत्रपती संभाजीनगर येथील बी ए एम एस चे शिक्षण घेतो. तर तीन आरोपी हे लातूर शहरातील आहेत.
या घटनेत चार आरोपींना पोलीस कोठडी तर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान याप्रकरणी अधिकचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
