मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास एक स्कोडा कार वानवडा रस्त्यावर पेटताना स्थानिक नागरिकांनी पाहिली. या घटनेची माहिती ११२ या आपत्कालीन क्रमांकावर देण्यात आल्यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
advertisement
कारची पाहणी केली असता, आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह जळून कोळसा झाल्याचे दिसून आलं. धक्कादायक म्हणजे, मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते, ज्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून क्रूर घातपात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. प्रथमदर्शनी हा मृतदेह गणेश गोपीनाथ चव्हाण (वय ३५) यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
'ती' कारही होती ओढून आणलेली
मृत गणेश चव्हाण हे एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे अनेकांशी आर्थिक व्यवहार होते. विशेष म्हणजे, ज्या स्कोडा गाडीत त्यांचा मृतदेह सापडला, ती कार हप्ते न भरल्यामुळे चव्हाण यांनीच ओढून आणलेली होती, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेमागे अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणताही गुन्हेगारी कट आहे का, या शक्यतांचा तपास पोलीस करत आहेत. या गंभीर घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
