अमर, अकबर, अॅन्थनी सिनेमातली तीन वेगवेगळ्या धर्माच्या सख्ख्या भावांची स्टोरी सुपरहिट झाली होती. दिग्दर्शक मनमोहन देसाईंचा हा सिनेमा आजही ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो. बहुतेक मनमोहन देसाईंकडून प्रेरणा घेत तसाच पण राजकीय सिनेमा निवडणूक आयोगानंही तयार केलाय. मनमोहन देसाईं प्रमाणे दिग्दर्शक झालेल्या निवडणूक आयोगानं धाराशिवच्या परांडामध्ये अमर अकबर अॅन्थनी सिनेमा तयार केलाय.
advertisement
बोगस मतदार नोंदणीची चौकशीची मागणी
एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी , ब्राह्मण अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंदणी करण्यात आली. या कागदपत्रांवरून हा सर्व घोळ स्पष्ट झालाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे 37 पैकी 5 मतदार उत्तर प्रदेशातील असल्याचा आरोप करण्यात येतोय. बोगस मतदार नोंदणीची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय.
एकाच घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या 37 मतदारांची नोंदणी
विशेष म्हणजे, ज्या घराच्या पत्त्यावर ही नोंदणी करण्यात आली, ते घर शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचं असल्याचं सांगितलं जातंय. मागील वर्षी परांडा विधानसभा मतदारसंघातली निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. अवघ्या दीड हजार मतांच्या फरकानं शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले होते. त्याच मतदारसंघात एकाच घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या 37 मतदारांची नोंदणी होणं, यांचा काही संबंध तर नाही ना? असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले.
राजकीय सिनेमाही उत्कंठावर्धक
परांडाध्ये निवडणूक आयोगानंच राजकीय अमर अकबर अॅन्थनी सिनेमा दिग्दर्शित केलाय. तर इकडे राजकारणातील अँग्री यंग मॅन राज ठाकरेही निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवून दे दणादण शाब्दिक हल्ले करताहेत. त्यामुळे हा राजकीय सिनेमाही उत्कंठावर्धक होत चालला आहे.