लातूर : लातूर शहरातील रेणापुर नाका परिसरात रात्री घडलेल्या एका भीषण प्रकाराने संपूर्ण शहर हादरले आहे. मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका तरुणाला काही अंतरावर फरफटत नेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बेधुंद कारचालकावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई रोडवरील रेणापुर नाका परिसरात रात्री एका कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तरुण कारच्या बोनटवर अडकला आणि कारचालकाने वाहन थांबवण्याऐवजी पुढे चालवत होता. हा तरुण कारने फरफटत आहे हे लक्षात येत असून सुद्धा कारचालक मस्तवाल पणे आपली गाडी चालवत होता, हे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे . शेवटी काही अंतरावर कार थांबली आणि कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
किरकोळ दुखापती झाल्या
सुदैवाने, फरफटत नेलेला तरुण जीव वाचवण्यात यशस्वी झाला असून त्याला किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ज्या पद्धतीने वाहन चालवले जात आहे याचे भयावह चित्र दिसून आले आहे. दरम्यान, लातूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्यामुळे पोलिसांना या प्रकरणात अडचणी येत आहेत. त्यामुळे अंबाजोगाई रोडवरील दुकानदारांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी हा प्रकार "हिट अँड रन" च्या अँगलनेही तपासात घेतला आहे. फरार कारचालकाचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांकडून पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या निष्क्रीयतेवर नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणं आणि रस्त्यांवरील बेदरकार वाहनचालक यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.