अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : राज्यात ओबीसी समाजातील असंतोष पुन्हा उफाळून आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या हालचालींना, शासकीय निर्णयाला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी संघटनांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतरही ओबीसी संघटनांचे समाधान झाले नाही. तर, दुसरीकडे या बैठकीला न बोलावल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे नाराज असल्याची चर्चा आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना आज जेजुरी गडावर येण्याचं आवाहन केले आहे. या ठिकाणी ते ओबीसी आंदोलनाची हाक देणार आहेत.
advertisement
लक्ष्मण हाके यांनी आज (5 ऑक्टोबर) जेजुरी गडावरून मोठ्या ओबीसी आंदोलनाची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. “ निमित्त दसऱ्याचे असो वा खंडोबाच्या दर्शनाचे असो, सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन लढ्याची तळी उचलू या,” असे आवाहन त्यांनी समाजातील तरुणांना केले आहे. या आंदोलनासाठी हाके यांनी राज्यभरातील हजारो ओबीसी तरुणांना जेजुरी गडावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जेजुरी गडावर आज सकाळी 11 वाजता, ओबीसींसह व्हीजेएनटी, दलित बांधवांसह अलुतेदार-बलुतेदारांना उपस्थित राहण्याचे आवाहन हाके यांनी केले आहे. ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठीचा निर्धार करायचा असल्याचे हाके यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आधीच दबाव वाढत असताना, हाके यांच्या नव्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओबीसींचा महामोर्चा...
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीतही ठोस तोडगा, समाधान न झाल्याने ओबीसी संघटनांनी आपण महामोर्चावर ठाम असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयाविरोधात (जीआर) ओबीसी संघटनांनी 10 ऑक्टोबर रोजी महामोर्चाची हाक दिली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याचा आक्षेप ओबीसी नेत्यांनी घेतला आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी खाडाखोड करून प्रमाणपत्रे तयार केली जात आहेत, यंत्रणांवर दबाव टाकून प्रमाणपत्रे बनवली जात आहेत, मराठवाड्यात दोन समाजांत वितुष्ट निर्माण झाले असल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला.