वर्धा: महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अशातच वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर वीज पडली. या घटनेत दोण जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा -हिंगणघाट मार्गावरील धोतरा चौरस्ता इथं ही घटना घडली आहे. वर्ध्याच्या सोनेगाव अल्लीपूर रस्त्यावर धोत्रा चौरस्ता इथं भिवापूर येथून चारमंडळ गावाकडे दुचाकीने जात असलेल्या वडील, मुलगा आणि पुतण्याच्या अंगावर वीज पडली.
भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे आपला 17 वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे यांच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या बाईकने भिवापूर येथून एका कर्यक्रमासाठी चारमंडळ या गावाकडे चालले होते. दरम्यान, धोत्रा चौरस्ता इथं आल्यावर अचानक गाडीवर वीज पडली. यात वडील अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे हे जागीच ठार झाले. तर मुलगा वेदांत ठाकरे हा गंभीर जखमी झाला आहे.
मुलगा वेदांत ठाकरे याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वर्ध्यात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. विजाच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने ही घटना घडली.
भंडाऱ्याचा सोदेपूर इथं वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनक्षेत्रात सोदेपूर गावातील शेतकरी रघुनाथ इसान उईके (५५) यांचा आज शेतात काम करत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. रघुनाथ उईके दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतात काम करत असताना अचानक पावसाने हजेरी लावली आणि वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सोदेपूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.