गणेश काळेच्या हत्येची घटना ताजी असताना आता आंदेकर टोळीचा आणखी एक कांड समोर आला आहे. कळंबा तुरुंगात असलेल्या आंदेकर टोळीच्या एका सदस्याकडे घातक गोष्ट आढळली आहे. त्यामुळे आंदेकर टोळी तुरुंगातही खूनी डाव रचतेय का? असा संशय व्यक्त केला जातोय. पुण्यातील गँगवॉर कोल्हापूरपर्यंत पोहोचलं का? याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. आता तुरुंग प्रशासन अलर्ट मोडवर असून कैद्यांची झडती घेतली जात आहे.
advertisement
कळंबा तुरुंगात नक्की काय घडलं?
कोल्हापूर शहरातील कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक-7 च्या पूर्वेकडील 4 नंबरच्या स्वच्छतागृहात झडतीदरम्यान तुरुंग प्रशासनाला पिस्तूलाचं एक जिवंत काडतूस सापडलं आहे. याप्रकरणी मोक्कातील कैदी सुरेश बळीराम दयाळू आणि अमीर ऊर्फ चंक्या असिर खान या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमीर खान ऊर्फ चंक्या हा पुण्यातील आंदेकर टोळीचा सदस्य आहे. निखिल आखाडेच्या खुनात तो सध्या कळंबा कारागृहात बंदी आहे. शनिवारी (दि. 1) दुपारी पुण्यातील कोंढव्यात गणेश काळे याचा आंदेकर टोळीने खून केला होता. गणेश हा वनराज आंदेकर खुनातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. गणेशच्या खुनात कळंबा कारागृहातून अमीर खान याने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे. या प्रकरणी त्याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता त्याच्याकडे थेट कारागृहातच पिस्तुलाचे जिवंत काडतूस मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे कारागृहाची सुरक्षा भेदून हे काडतूस कारागृहात आणण्यात आलं आहे. दरम्यान, काडतूस आले तर पिस्तूल देखील आतमध्ये आणण्याची तयारी अमीर खानने केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे कळंबा कारागृहात आंदेकर टोळीच्या टार्गेटवर कोण? असा देखील सवाल आता निर्माण झाला आहे.
