बीड : राज्यभरात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमधल्या महायुतीच्या या मेळाव्यात वाद पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या स्टेजवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, यानंतर प्रीतम मुंडे यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला. मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, असा इशारा प्रीतम मुंडे यांनी दिला.
advertisement
'मुंडे साहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्रात कुठेही मोठी घडामोड घडत नाही, त्या मुंडे साहेबांचा फोटो प्रोटोकॉलमध्ये येत नाही, हे कारण मनाला पटत नाही. हा प्रशासकीय कार्यक्रम नव्हता, त्यामुळे असं करणं चुकीचं आहे,' अशी खंत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली. महायुतीच्या या मनोमिलन मेळाव्याला राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते.
मनोमिलन मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले, यानंतर काही वेळातच गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले. कार्यक्रमाच्या स्टेजवर लावण्यात आलेल्या बॅनरवर महायुतीतल्या सगळ्याच घटकपक्षांच्या प्रमुखांचे फोटो लावण्यात आले होते, पण यात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता, त्यामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.
