उकाडा वाढला, थंडी ओसरली
मागच्या दोन दिवसांपासून थंडी थोडी ओसरली असून कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. गारठा हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सात जिल्ह्यात आगामी २६ जानेवारीपर्यंत हे ढगाळ वातावरण कायम राहणार असून, पहाटे दाट धुके पडण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची भीती निर्माण झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.
advertisement
वातावरणात अचानक बदल का?
हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पश्चिमेकडून येणारे वारे सक्रिय झाले आहेत. त्यातच हिमालयात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर-पश्चिम दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, वाऱ्याचा वेग ताशी ५ ते १० किमी इतका नोंदवण्यात आला आहे.
या 7 जिल्ह्यांवर पावसाचं संकट
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असेल. तर कमाल तापमानात २-३ डिग्रीने वाढ होणार आहे. कमाल तापमान 33 ते 35 डिग्रीपर्यंत पोहोचत आहे. हे सगळं असलं तरीसुद्धा निफाड आणि धुळ्यात गारठा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. गेल्या दोन दिवसात किमान तापमान साधारण 3 डिग्री सेल्सियसने वाढ झाली आहे. तर तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट झाली.
पिकांना बसणार मोठा फटका!
ढगाळ वातावरणामुळे तूर, ज्वारी, मका आणि हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. कापसाच्या पिकालाही या आर्द्रतेचा फटका बसत आहे. यंदा आंबा काजूचा मोहर चांगला आला आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीपर्यंत किमान तापमान ११ ते १७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने रात्री कडाक्याची थंडी आणि दिवस उबदार असेल.
