बॉलीवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित यांनी अखेर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती तिने राजकारणावर भाष्य केले. स्वभाव, दृष्टिकोन आणि आवड ही सर्जनशील क्षेत्राशी अधिक जुळणारी असून राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारणे तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं नसल्याचे माधुरी दीक्षितने म्हटले.
राजकीय प्रवासाबाबत विचारले असता माधुरी दीक्षितने म्हटले की, मला माहीत नाही… पण मला वाटत नाही की मी राजकारणासाठी बनलेली आहे. मी कलाकार म्हणूनच लोकांपर्यंत पोहोचू शकते—जागरूकता निर्माण करू शकते, माझे विचार शेअर करू शकते, लोकांना मदत करू शकते. तिथेच मी माझे काम अधिक प्रभावीपणे करू शकते,” असे माधुरीने स्पष्ट केले. राजकारणात जाणं हे माझं कधीही लक्ष्य नव्हते आणि त्या क्षेत्रात मी स्वत:ला तिथे पाहत नाही, असेही तिने स्पष्ट केले.
advertisement
माधुरीने पुढे म्हटले की, कलाकार म्हणून मिळणारा प्रभाव अधिक नैसर्गिक आणि मनाला पटणारा आहे. राजकारणापेक्षा कला क्षेत्रातून समाजावर परिणाम घडवण्याची क्षमता अधिक असल्याचा तिचा ठाम विश्वास आहे.
माधुरी पुन्हा ओटीटीवर...
नागेश कुकुनूर दिग्दर्शित थ्रिलर-ड्रामा सिरीज ‘मिसेस देशपांडे’ मधून ती पुन्हा एकदा OTT वर झळकणार आहे. ही सिरीज फ्रेंच थ्रिलर La Mante वर आधारित असून त्यात माधुरीची वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियांशू चटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
