पुण्यातील इंदापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली. त्यांनी म्हटले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत महाराष्ट्रातील ९९ टक्के जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. हा अपघात होता की घातपात? याचे सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या अहवालावर विसंबून न राहता, केंद्र सरकारने सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी," अशी आक्रमक मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जानकर यांनी या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
advertisement
महादेव जानकर म्हणाले की, "अजित दादांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघात होतो, तेव्हा जनमानसात विविध शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सध्या जो सरकारी अहवाल समोर येत आहे, त्यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. जर सरकारला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल, तर त्यांनी या प्रकरणाचे 'दूध आणि पाणी' वेगळे करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे."
सीबीआय चौकशीची गरज
यावेळी जानकर यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली. "केवळ पोलीस तपासावर जनता समाधानी नाही. यामागे कोणते मोठे कारस्थान आहे का, हे शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास व्हायला हवा. जे सत्य आहे ते बाहेर यावे, हीच राष्ट्रीय समाज पक्षाची अधिकृत भूमिका आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
