सभागृहात विरोधकांकडे सेनापतीच नाही...
विरोधी पक्षनेता नसतानाही विरोधक सरकार विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. संख्याबळाचा दाखला देत विधान सभेत अजूनही विरोधी पक्षनेते पद जाहीर करण्यात आले नाही. तर, दुसरीकडे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेल आहे.
advertisement
विरोधकांच्या हाती कोणते मुद्दे?
विरोधाकांकडून सरकारविरोधात मुद्दे आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यासह अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधक आक्रमक होण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंडवा येथील सरकारी जमीन कवडीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झाले. या प्रकरणी विरोधी पक्ष अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात रेटून धरणार असल्याचे म्हटले जात आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, मंत्री संजय शिरसाठ यांच्यावरील सिडको जमीन घोटाळ्याचा कथित आरोप, साताऱ्यातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, भाजप नेत्यांवर होत असलेले आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपूरचं हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
