गृह खात्यासोबतच महसूल खाते, नगरविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते मिळावीत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीमुळे निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. गृह खाते न मिळाल्यास उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री नसतील तर आम्हीदेखील कॅबिनेट मध्ये नसणार अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या दबावतंत्राला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही नगरविकास खात्यावर आपला दावा सांगितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह खात्या इतकंच नगरविकास खातेदेखील महत्त्वाचे समजले जाते. मागील महायुती सरकारच्या काळात आणि त्याआधी महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे केलेल्या मागणीत गृह खात्यासह नगर विकास खात्याची मागणी केली होती. भाजपने एकनाथ शिंदे यांना नगर विकास खाते देण्याची तयारी दिली होती. तर, गृह खाते देण्यास नकार दिला होता.
एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर भाजपनेही दुसरा डाव टाकला आहे. भाजपने आता थेट नगर विकास खात्यावर दावा केला आहे. नगर विकास खाते आम्हाला मिळावे असे भाजप नेत्यांनी म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता, या दबाव तंत्रामुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
