स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वाजारोहण केले जाते. जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण केले जाते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात संघर्ष सुरू आहे. रायगडचे पालकमंत्री मिळावे यासाठी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी जोर लावला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही दावा केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामुळे महायुती सरकारने जाहीर केलेली रायगडचे पालकमंत्री नियुक्ती मागे घेतली. त्यावेळी अदिती तटकरे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.
advertisement
आमचा उठाव राज्याने पाहिलाय....
आता, राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले की, "ध्वजारोहणाचा मान ज्यांना मिळालाय, त्यांना कदाचित आमच्या उठावाचा विसर पडलाय. ‘रायगड पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय.मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती असताना सुद्धा असा अधिकार शासनाने देऊ नये असा संतापही आमदार दळवी यांनी व्यक्त केला.
महेंद्र दळवी यांनी म्हटले की, रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे तीन आमदार असून, जनतेने दिलेला जनाधार लक्षात घेऊन निर्णय झाला पाहिजे. सुनिल तटकरे यांनी मोठं मन करून खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या न्यायासाठी लढणाऱ्या आमदार भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदासाठी शिफारस करायला हवी होती, असेही दळवी यांनी म्हटले.
ध्वजारोहणापासून रोखणार?
आमच्या कार्यकारणीची बैठक घेऊन यावर योग्य निर्णय घेऊ आणि महाराष्ट्र दिनाला मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास त्याला कशा पद्धतीने विरोध करायचा ते आम्ही निश्चित करू असा इशारा सुध्दा आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात याचे पडसाद दिसण्याची शक्यता आहे.
