आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, यापूर्वी मतदानाच्या दिवसापूर्वीच्या 24 तासांपासून सर्व प्रकारचे प्रचारकार्य पूर्णतः बंद राहायचे. यात सभा, जाहीर मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर, तसेच वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरील निवडणूक जाहिरातींवरही प्रतिबंध होता. या मर्यादा उमेदवारांसाठी विशेषतः शेवटच्या क्षणी प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत होत्या.
अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप उशिराने करण्यात आले. त्यामुळे प्रचाराला अवधी मिळालाच नसल्याची तक्रार करण्यात आली होती. अखेर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आयोगाने नियमांमध्ये सशर्त शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार परवानगी मिळाल्याने उमेदवारांना अंतिम दिवशी सभा, पदयात्रा, घर-दार संपर्क मोहिमा आणि सोशल मीडियाद्वारे आपला संदेश पोहोचवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे.
advertisement
३५ जागांवरील निवडणूक स्थगित...
राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यांतील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील ३५ जागांवरील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. त्यामुळे २ डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द झाले आहे. छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात संबंधित ३५ जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर २५ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते; मात्र अंतिम निर्णय न झाल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. न्यायालयाचे आदेश न मिळाल्याने या प्रभागांमध्ये उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटपच शक्य नसल्याने मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
