राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी सूप वाजले. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबरनंतर केव्हाही होऊ शकते, असे म्हटले जात होते. आज सायंकाळी महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती समोर आली आहे.
आज भूमिपूजन, उद्घाटनाचा धडाका...
आज १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमास हजर राहणार आहेत. त्यामुळे आजच महापालिका निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे.
advertisement
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते.
मतदान कधी होणार?
सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. निवडणूक आयोग १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, हा अनुभव लक्षात घेऊन १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी अशा दिवशी मतदान होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
