मनी लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या कारणाने नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. जवळपास दोन वर्ष तुरुंगात काढल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मलिकांना जामीन मंजूर केला. मलिकांना हा जामीन प्रकृतीच्या कारणाने देण्यात आला होता. मात्र, मलिक हे सध्या शिवाजी नगर मानखुर्दमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. मलिकांविरोधात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार दिला आहे. या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला आहे.
advertisement
मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध का?
मलिक हे अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. मलिक यांच्याऐवजी त्यांची कन्या सना मलिक ही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्यावरून भाजपने ठाम भूमिका घेतली होती. मलिक हे मविआ सरकारच्या काळात मंत्री असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या पुराव्यांमुळे नवाब मलिक हे तुरूगांत होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असून त्यांच्याशी व्यवहार केले असल्याचा आरोप आहे. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला होता. मलिकांवर असलेल्या गंभीर आरोपांमुळे भाजपने त्यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली.