राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने वाढवली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या निर्णयानंतर निवडणुका आणखी पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मूळ नियोजनानुसार २७ ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी अंतिम करायची होती, मात्र आता ही प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार ३ नोव्हेंबरपर्यंत छापील मतदार याद्या अधिप्रमाणित केल्या जाणार असून, याच दिवशी संबंधित सूचना प्रसिद्ध केल्या जातील. तर १२ नोव्हेंबरला मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
advertisement
आधी नगरपालिका-नगरपंचायत निवडणुका...
या मुदतवाढीमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता बळावली आहे. आधीच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना प्राधान्य दिले जाणार असल्याच्या चर्चेमुळे ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
महापुरामुळे निवडणुकीला उशीर?
दरम्यान, गेल्या महिन्यात मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. सध्या परतीचा पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अनेकांना नुकसानभरपाईची रक्कम अजून मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पंचनामे आणि मदतकार्यांमध्ये गुंतलेली असल्याने, सध्या निवडणूक प्रक्रिया थोडी मागे ठेवण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्षअखेर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदान कधी?
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी निवडणुका पार पडणार आहे. यासाठीचे मतदान डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
