भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं भगदाड पाडलं आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांनी आणखी एका पक्षाबाबत भाष्य केले आहे.
कोणत्या पक्षाला बसणार हादरा?
आज माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाजन म्हणाले की, "सध्या विधानभवनाच्या लॉबीमध्ये कॉंग्रेसचे अनेक आमदार आमच्याशी संपर्कात आहेत. ते स्वतःहून भेटायला येत आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत." या विधानामुळे आगामी काळात विरोधी पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
ते पुढे म्हणाले की, "येणाऱ्या काही दिवसांत काही आमदार आणि खासदार यांच्या संदर्भात राजकीय घडामोडी होणार आहेत. काही तांत्रिक बाबी आहेत, मात्र त्या पूर्ण करण्यात येतील." या वक्तव्याने अनेक चर्चांना उधाण आले असून भाजपकडून आणखी 'विकेट' पाडण्याची तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपकडून नेमक्या कोणत्या पक्षाला धक्का बसणार याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक पातळीवरील वाद टाळण्याचे प्रयत्न
गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं की, "ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, त्यांच्याबाबत स्थानिक नेतृत्वाशी समन्वय साधला जात आहे. कोणतेही वाद निर्माण न होता नियोजनबद्ध प्रवेशासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
यापूर्वीही अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांचे हे विधान केवळ इशारा नसून, आगामी राजकीय 'ऑपरेशन'ची सुरुवात असल्याचं जाणकार मानत आहेत.