महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला लागलेला पाऊस पुन्हा महाराष्ट्रात मुक्काम वाढवत आहे. पाऊस पुन्हा रौद्ररूप धारण करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तब्बल 2250 किलोमीटर दूर एक शक्तिशाली वादळ घोंघावत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रतही दिसणार आहे.
महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. त्यामुळे राज्यात आता आहे, त्या पेक्षा आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काळात हे संकट आणखी भीषण आणि वाईट होण्याची शक्यता आहे.
advertisement
नेमके काय घडत आहे?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली तयार होत आहे. ही प्रणाली हळूहळू आतल्या बाजूने सरकत ती अधिक तीव्र होऊन 'डिप्रेशन'मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे 27 ते 30 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेलं. अशातच आता पुन्हा एकदा वादळाचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवामान विभागाने या संभाव्य वादळाबाबत आधीच अलर्ट जारी केला असून, दररोज यासंदर्भात माहिती अपडेट केली जात आहे. प्रशासनानेही संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
पूर येऊ शकणाऱ्या भागातील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करावं असं आवाहन केलं आहे.