गोरेगाव येथील ओवेस सरखोत (२५) याचं येत्या २९ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. त्याच्या लग्नाच्या तयारीसाठी त्याचे वडील सज्जत सरखोत (५५) हे खास दुबईहून घरी परत आले होते. वडिलांना विमानतळावरून घेण्यासाठी ओवेस आणि त्याचा लहान भाऊ सरजीच (२०) हे मुंबईला गेले होते.
वडिलांना घेऊन तिघेही कारने आपल्या मूळगावी, गोरेगावच्या दिशेने परतत होते. शनिवारची पहाट होती आणि गावापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरच कोलाडनजीकच्या पुई गावाच्या हद्दीत त्यांच्या कारने पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
advertisement
या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीनंतर, कारमधील नवरदेव ओवेस सरखोत (२५) आणि त्याचे वडील सज्जत सरखोत (५५) यांचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. लग्नाच्या तोंडावर पिता-पुत्राचे निधन झाल्याने गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात कारमधील इतर दोघे, कारचालक उस्मान कारविलकर (२१) आणि ओवेसचा भाऊ सरजीच सरखोत (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ कोलाड आणि माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
