सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्याच पक्षांमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. ठाकरे गटाने मुंबईत दमदार कामगिरी केली असली तरी राज्यातील इतर पालिकांमध्ये निराशाजनक परिस्थितीत आहे. सोलापूर पालिकेमध्ये ठाकरे गटाला फक्त २ जागांवर समाधान मानावं लागलं. तसंच पक्षातही मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे आता सोलापुरात ठाकरे गटात खांदेपालट करण्यात आले आहे. फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची सोलापूरच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहे. सोलापूर उबाठाच्या संपर्क प्रमुखपदी शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
महापालिका निवडणुकीअगोदर शिवसेना उबाठाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान सुषमा अंधारे समोर असणार आहे.
त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे या सुद्धा सोलापूरच्याच असल्याने येणाऱ्या काळात अंधारे विरुद्ध वाघमारे सामना पाहायला मिळणार आहे.
पालिका निकालात फक्त सेनेला २ जागा
सोलापूर महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची निराशजनक कामगिरी राहिली. फक्त २ नगरसेवक निवडून आले आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहे. शिवसेना जेव्हा एकत्र होती, त्यावेळी मागील निवडणुकीत शिवसेनेच्या सोलापुरात २१ जागा होत्या. आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी आता अंधारे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
