शेतातून पाणी घेण्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर येथील गुडघे कुटुंबात शेतातील सामायिक विहिरीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी मनीषा गुडघे या विहिरीतून पाणी घेण्यासाठी गेल्या असता, त्यांचे सासरे बबन गुडघे यांनी त्यांना विरोध केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात सासऱ्याने जवळच असलेली लाकडी काठी घेऊन सुनेवर अचानक हल्ला चढवला. त्याने सुनेला अमानुष मारहाण केली.
advertisement
जीव वाचवून सूनेने काढला पळ
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सासरा बबन गुडघे हा अमानुषपणे मनीषा यांना काठीने मारत आहे. मनीषा यांनी या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला आणि कसाबसा आपला जीव वाचवला. या मारहाणीत मनीषा गुडघे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. येवला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी सासरा बबन गुडघे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून महिलेवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.
