विशेष म्हणजे कोकाटे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट देखील जारी केला आहे. असं असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे. आम्ही आणखी एका मंत्र्याची विकेट पडण्याची वाट पाहात आहोत, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी थेट महायुतीच्या मंत्र्याचं नाव घेतलं आहे.
advertisement
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, "मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे, हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता. ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे! असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा. आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत!"
माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणात दोषी?
माणिकराव कोकाटे यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील काही सदनिका लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण 1995 सालचे आहे. या प्रकरणात कोकाटे दोषी ठरले आहेत. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. हीच शिक्षा आता सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद काढून घेण्यात आलं असून त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना अटक होणार की दिलासा मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
