मुंबई: मराठा आरक्षणासाठीचे आमरण उपोषण आंदोलन मनोज जरांगे यांनी मंगळवारी मागे घेतले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मंजूर झाल्यानंतर आणि शासनाने तसा अध्यादेश जाहीर केला. मराठा समाजाने निर्णायक यश मिळवल्याचे दावा करत मुंबईत मराठा आंदोलकांनी विजयाचा गुलाल उधाळला. तर, दुसरीकडे आता ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
advertisement
मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसींमधून देण्याची मागणी करण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून प्रमाणपत्र दिल्यास ओबीसीतील वंचिच घटक आरक्षणापासून वंचित राहतील असा आक्षेप ओबीसी नेत्यांकडून घेण्यात येत होता. हैदराबाद गॅझेटसह इतर मागण्याही मान्य केल्या आहे. आता मराठा बांधवांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. आता या विरोधात ओबीसी नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्ह आहेत.
लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाची हाक....
मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आंदोलनाची हाक दिली आहे. सर्व ओबीसी बांधवांनी बुधवारी, 3 सप्टेंबर रोजी आपल्या तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित जीआर (शासकीय निर्णय) ची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन हाके यांनी केले आहे. तसेच, मोठ्या संख्येने एकत्र येऊन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र देऊन या निर्णयाचा विरोध करावा असे हाके यांनी सांगितले.
भुजबळांची सावध प्रतिक्रिया...
राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकाने मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंद आहेत अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जो शासन निर्णय आणला आहे. त्याचा सखोल अभ्यास आमच्याकडून आणि आमच्या टीमकडून चालू आहे. यामध्ये आम्ही विधीज्ञांशी देखील चर्चा करत आहोत. त्यामुळे यावर सविस्तर अभ्यास करून मी माझी भूमिका मांडेन, असे भुजबळ यांनी सांगितले.