मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना गेल्या काही तासांपासून तीव्र ताप येत होता. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेले दौरे, सभा आणि आंदोलनांच्या नियोजनामुळे त्यांच्या शरीरावर मोठा ताण आला होता. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच, छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाज बांधव आणि त्यांच्या समर्थकांनी गॅलक्सी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, सध्या कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यापूर्वीही उपोषण आणि आंदोलनांदरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती अनेकदा बिघडली होती. त्यावेळीही डॉक्टरांनी त्यांना दीर्घकाळ विश्रांती घेण्याचे आवाहन केले होते.
