मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील त्यांच्या काही समर्थकांनी जालना पोलीस ठाण्यात केली होती. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट दोन व्यक्ती रचत असल्याचा संशय या तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाने केली कारवाई
या तक्रारीची तातडीने दखल घेत जालना गुन्हे शोध पथकाने वेगाने तपासचक्र फिरवली. तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळत ही कारवाई केली आहे. या दोन्ही संशयितांना सध्या अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले असून, जालना पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याच्या शक्यतेने मराठा समाज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पोलिसांनी या कटामागील सूत्रधार आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे. या चौकशीतून लवकरच मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
