मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी येथील मयत नेहा पवार हिच्या आत्महत्येमागे कौमार्य चाचणी आणि जादुटोण्याचं कारण असून त्याचा पोलिसांनी तपास करावा, असं महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपी संतोष पवार याच्या घराची झडती घेतांना जादुटोणाचे साहित्य मिळालं. नागाचा आकार असलेल्या खिळ्याला काळा बिबा आरपार केलेला आढळला. त्यासोबत गंडेदोरे आणि ताविज पण मिळाले. हे साहित्य कुठून आणले,अशी पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भोंदुबाबाचे नाव सांगितलं.
advertisement
मयत नेहा पवार ही माहेरावरुन राखेसारखी भस्माची पुडी आणत होती. त्यामुळे घरात अडचणी येतात. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि नेहाला भिती घालण्यासाठी जादुटोणा केल्याचे आरोपी संतोष पवार आणि जिजाबाई पवार यांनी सांगितलं. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी नाशिकच्या हिरावाडी येथून सुनिल बबन मुंजे (वय -४२ वर्ष )या मांत्रिकाला सोमवारी रात्री अटक केली.
त्याने त्याच्या राहत्या घरी मंदिर आणि दरबार करुन लोकांच्या समस्यांवर दैवी आणि अघोरी इलाज करण्याचे काम करत तो होता. त्याने गुन्ह्यांची कबुली सुद्धा दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला सहआरोपी बनवलं असून जादुटोणा विरोधी कायद्याचे कलम लावले आहेत.न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहे.
दरम्यान, सदर भोंदुबाबाने आणखी कुणाला फसवलं त्याची चौकशी पोलिसांनी करावी. लोकांनी अशा अंधश्रद्धायुक्त प्रकारांपासून दूर राहावं. कुणाची फसवणूक झाली असल्यास अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा" असं आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलंय.
नेहाने सुसाईट नोटमध्ये काय लिहिलं?
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी तिने ही चिठ्ठी माहेरच्यांना पाठवताना कळकळीची विनंती केली होती. मी लिहिलेली चिठ्ठी सासरच्या लोकांना सापडली तर ते पुरावे नष्ट करतील माझा छळ करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो मी तुम्हाला पाठवत आहे. रोज थोडे थोडे मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे. सासरच्यांनी तिच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नसावा असं हे चिठ्ठी वाचून तरी वाटत आहे. नेहाचं लग्न जूनमध्ये 15 लाख रुपये खर्च करुन झालं. लग्नानंतर काही दिवसांतच वेगवेगळ्या पद्धतीनं मानसिक छळ सुरू झाला. नणंद सासू आणि नवऱ्याचे कान भरायची. सगळं करुनही काहीच काम करत नाही, नुसती मोबाईलवर बोलते असे सारखे टोमणे मारायची, काहीही हवं असेल तर तुझ्या माहेरातून आण, पैसे घेऊन ये असा तगादा लावला जात होता. लग्नात परंपरेनुसार आणि नवरदेवाच्या मागणीनुसार सोनं नाणं घाला असं सांगितलं.
कौमार्य चाचणीत यशस्वी न झाल्याने छळ
पतीकडून दोन महिने सतत चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला जात होता. कौमार्य चाचणीत यशस्वी न झाल्याने पुन्हा छळ सुरू झाला. तुझं माहेरी कुणीतरी ठेवलेला आहे असे आरोप करण्यात आले. कौमार्य चाचणी यशस्वी झाल्यानंतर पतीनं चारित्र्यावर संशय घेणं कमी केलं. माहेरी आल्यावरही जास्त दिवस राहायचं नाही राहिलं तर ते माहेरच्या लोकांना उलट सुलट सांगून त्यांचे कान भरायचे, धमकी द्यायचे. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने अखेर चिठ्ठीत लिहिलं आहे रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी एकदाच विष खाऊन झोपते. यावरुन लक्षात येईल तिचा किती भयंकर छळ होत होता.
