मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची हाक दिली. मुंबईत मराठा समाज उपोषण आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्ट रोजी या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. मुंबईतील आंदोलनात सगळ्याच मराठ्यांनी आपले कामधंदे बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचे वादळ धडकणार असल्याने राज्य सरकारने हालाचाली तीव्र केल्या आहेत. मराठा समाजाने आंदोलन पुढे ढकलण्याची मागणी केली जात असताना आता शासकीय पातळीवर सरकारने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
मराठ्यांचे वादळ धडकणार, मंत्रालयात हालचाली...
नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज मंत्रालयात पार पडणार आहे. दुपारी २ वाजता होणाऱ्या या बैठकीस उपसमितीचे अध्यक्ष आणि सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असून, आजच्या बैठकीत आरक्षणासंदर्भातील विविध कायदेशीर व प्रशासकीय पैलूंवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून मुंबईत अनिश्चित उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपसमितीची आजची बैठक अधिकच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि न्याय्य आरक्षण मिळवून देण्यासाठी उपसमितीकडून ठोस भूमिका घेण्याची मागणी समाजातून होत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असताना, आजच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
