जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या भांबेरी या गावामध्ये जरांगे पाटील हे मुक्कामी होते. मात्र, याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसंच पहाटेच्या वेळी पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि बसही पेटवून देण्यात आली. याठिकाणी आता थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
advertisement
Manoj Jarange Patil : एक पाऊल मागे का घेतलं? जरांगेंनी सांगितलं मुंबईऐवजी अंतरवालीला जाण्याचं कारण
मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या संचारबंदीनंतर जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.”
अंतरवाली सराटीमध्ये पोलीस बंदोबस्त -
अंतरवाली सराटी आणि परिसरामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. अंतरवाली गावापासून आठ ते दहा किलोमीटर परिसरातच पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. आंदोलकांची गर्दी होणार नाही या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
