ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ वरील गांधीनगर परिसरात एका किरकोळ वादातून तणावाचे सावट निर्माण झाले. गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणानंतर काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला धमक्या देत परिसरात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासंदर्भात अतिशय अभद्र आणि विटंबन करणारे शब्द वापरल्याचा आरोप आहे.
advertisement
गाडी पार्किंगच्या वादातून सुरुवात
गांधीनगर भागात एका वाहनाच्या पार्किंगवरून दोन गटात वाद झाला. हा वाद क्षणात ताणला गेला आणि परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला दमदाटी करत अर्वाच्य शिविगाळ केली. “ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्या का राज चलता है”, “कौण राज ठाकरे, कौण अविनाश जाधव मेरे XXX…” अशा अपमानास्पद उल्लेखांसह धमकीची भाषा वापरल्याचे समोर आले आहे.
परप्रांतीय तरुणांनी एका मराठी युवकाला परिसरातून अक्षरश: हुसकावून लावले. “इधर कोई भी मराठी आया तो उसकी…” असा अवमानकारक इशारा देत परिसरात दादागिरी केल्याचेही समजते. घटनेदरम्यान काही तरुण दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांमध्ये संतप्त भावना...
घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप उसळून आला आहे. स्थानिक मराठी आणि मनसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला असून शिविगाळ करणाऱ्या तरुणांचा शोध घेतला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील तणाव आणखी वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
