शुभम संजय मुंडे असं गुन्हा दाखल झालेल्या २३ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील अगरवाडी येथील रहिवासी आहे. तर पीडित २३ वर्षीय विवाहित तरुणी ही परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे आपल्या पतीसोबत पटत नसल्यामुळे ती आपल्या मुलासोबत माहेरी राहायला आली होती. याचदरम्यान, तिची ओळख शुभम संजय मुंडे या तरुणासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. या ओळखीचे लवकरच मैत्रीत रूपांतर झाले.
advertisement
शुभम मुंडे याने पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेत तिला सहानुभूती दाखवली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. लग्नाच्या भूलथापा देऊन शुभमने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि वेळोवेळी तिचा गैरफायदा घेतला, असा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.
या अत्याचारानंतर जेव्हा पीडितेने शुभमला लग्नाबद्दल विचारले, तेव्हा त्याने लग्नास नकार दिला आणि तिची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित विवाहितेने तातडीने गंगाखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, शुभम संजय मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
