मिरा-भाईंदर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणीपूर्वी उत्तेजक द्रव्य टोचून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २३ वर्षीय उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या इतर उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिरा-भाईंदरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी या मैदानावर उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार होती. यावेळी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी साध्या वेशातील अमली पदार्थ विरोधी पथक मैदानावर गस्त घालत होतं. या गस्ती दरम्यान, पथकाला एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. हा तरुण स्वतःच्या शरीरात इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं.
advertisement
कोण आहे हा तरुण?
अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव साहिल शंकर अजवेके (वय २३) असं आहे. तो पुणे जिल्ह्यातील बारामती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धावण्याच्या चाचणीत चांगली कामगिरी करता यावी, स्टॅमिना वाढावा म्हणून त्याने अशाप्रकारे उत्तेजक द्रव्य घेण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांची कारवाई
मिरा-भाईंदर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस बनायला गेलेला हा तरुण थेट गुन्हेगार ठरला आहे. त्याचं भविष्य देखील टांगणीला लागलं आहे.