गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि सुसाट धावणाऱ्या टिप्परने महिलेचा बळी घेतला आहे. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना काळाने रामेश्वरी नागपुरे या महिलेवर झडप घातली. या घटनेने संतप्त झालेल्या दासगावच्या ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत रस्ता रोको केला आणि टायर जाळून आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. तालुक्यातील दासगाव परिसरात मंगळवारी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली.
advertisement
अवैध रेती वाहून नेणाऱ्या एका भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत रामेश्वरी नागपुरे (रा. कटंगी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर नागरिक संतापले असून नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
मुलीच्या डोळ्यादेखत आईचा जीव गेला
समोर आलेल्या माहितीनुसार, कटंगी येथील रहिवासी असलेल्या रामेश्वरी नागपुरे या आपल्या मुलीसोबत स्कुटीने एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघाल्या होत्या. दासगाव परिसरातून जात असताना अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की रामेश्वरी यांचा जागीच प्राण गेला. जखमी मुलीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
....तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही
अपघात घडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला रावणवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत टिप्पर मालक मृत महिलेच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची भरपाई देत नाही आणि जखमी मुलीच्या उपचाराचा खर्च लेखी स्वरूपात मान्य करत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
रस्ता रोकोमुळे परिसरात तणावाचे वातावरण
गोंदिया जिल्ह्यात रेतीमाफियांचे वर्चस्व वाढले असून वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले आहेत. दासगाव येथील या घटनेने प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षावर बोट ठेवले असून रस्ता रोकोमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र मदतीच्या ठोस आश्वासनाशिवाय मागे हटण्यास नागरिकांनी नकार दिला.
