महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शालेय सहलींच्या माध्यमातून तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या उत्पन्नात ३३ कोटी २९ लाखांची घसघशीत वाढ झाली असून, एसटीने आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.
२५ हजारांहून अधिक बस फेऱ्यांचा 'विक्रम'
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,
advertisement
यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातून शाळा-महाविद्यालयांच्या मागणीनुसार तब्बल २५ हजार ५५८ बस फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या फेऱ्यांमधून लाखो विद्यार्थ्यांनी गड-किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
या तीन कारणांनी एसटीला पसंती?
शाळा आणि महाविद्यालयांनी एसटी बस बुक केल्यास शासनाकडून प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. यामुळे खाजगी बसच्या तुलनेत एसटीचा प्रवास अत्यंत स्वस्त पडतो.
एसटीचे अनुभवी चालक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम गाड्यांमुळे पालकांचा विश्वास एसटीवर जास्त आहे.
यंदा महामंडळाने सहलींसाठी 'शिवाई', 'ई-बसेस' आणि नवीन अद्ययावत गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक आरामदायी झाला.
''खासगी बसेस ऐवजी एसटी बसने प्रवास करा''
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, "शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा असतो. ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना गड-किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी एसटी हेच एकमेव साधन आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही, हे या आकडेवारीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे," असे प्रतिपादन प्रताप सरनाईक यांनी केले. तसेच, आगामी काळातही शाळांनी खाजगी बसेसऐवजी एसटीचाच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
