विशाल गोसावी असं हत्या झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर ऋषीकेश आत्माराम धनगर आणि आकाश आत्माराम धनगर असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. आरोपी ऋषीकेश आणि विशाल हे दोघे चांगले मित्र होते. दोघांचं एकाच मुलीवर प्रेम होतं. याच कारणातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
advertisement
नेमकी घटना काय घडली?
या घटनेची अधिक माहिती देताना मुक्ताईनगरचे डीवायएसपी सुभाष ढवळे यांनी सांगितलं की, काल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात विशाल गोसावी हा २४ वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली. विशाल बेपत्ता होण्याआधी आरोपी ऋषीकेशसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी ऋषीकेशला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. भाऊ आकाश धनगर याच्या मदतीने विशालला संपवल्याचं त्याने सांगितलं. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीच्या भावालाही ताब्यात घेतलं. तसेच घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
घटनेच्या दिवशी विशाल, ऋषीकेश आणि आकाश तिघेही हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आल्यानंतर तिघेही दारु पार्टी करायला बसले. दारू पिताना विशालसोबत झालेल्या वादातून ऋषीकेशने भावाच्या मदतीने त्याची हत्या केली. प्रेम प्रकरणातून वाद होऊन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
