मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमधील दहीहंडी मंडळाकडून दहीहंडी लावली जात असताना किंबहुना रोप बांधत असताना गोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जगमोहन चौधरी असे मृत पावलेल्या गोविंदाचे नाव आहे.
दहीहंडीचा रोप बांधत असताना जगमोहन चौधरी यांचा तोल गेल्याने ते काही उंच अंतरावरून खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शताब्दी रुग्णालयाने चौधरी यांना मृत घोषित केलेले आहे.
advertisement
शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस पडत असला तरी गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गोविंदांकडून पावसात भिजून दहीहंड्यांचे मनोरे लावले जात आहेत. यादरम्यान दिवसभरात एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १५ गोविंदांवर उपचार सुरू असून १५ गोविंदांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहेत.
मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणची गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी मोठी स्पर्धा असते. यादरम्यान उंच थरावरून कोसळून अनेक गोविंदा जखमी होत असतात. दरवर्षी जखमी गोविंदांना लगोलग उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज असतात.