याप्रकरणी वरळी पोलिसांनी मृत डॉ. गौरी यांचे पती अनंत गर्जे, दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जे अशा तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जे यांचा डॉ. गौरी पालवे यांच्यासोबत १० महिन्यांपूर्वी, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाह झाला होता. वरळी येथील आदर्श नगर येथील 'महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल' सोसायटीत हे दाम्पत्य राहात होते. डॉ. गौरी या उच्चशिक्षित असून, फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान शीव रुग्णालयाच्या दंत विभागात आणि त्यानंतर केईएम रुग्णालयाच्या दंत विभागामध्ये कार्यरत होत्या.
advertisement
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून अनंत गर्जे याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय डॉ. गौरी यांना होता. यावरून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. नुकतेच घर बदलत असताना डॉ. गौरी यांना जुन्या घरात अनंत गर्जे यांच्या अनैतिक संबंधाचे काही ठोस पुरावे आढळले, ज्यामुळे पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेले.
गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या दाव्यानुसार, पुरावे मिळाल्यानंतर झालेल्या भांडणादरम्यान अनंत गर्जे यांनी गौरीला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर, 'कोणाला सांगितल्यास, मी आत्महत्या करून चिठ्ठीत तुझे नाव लिहीन,' अशी धमकी दिल्याचा आरोप पालवे यांनी केला आहे. तसेच, अनंत यांचा भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल गर्जे हे दोघेही गौरीचा सातत्याने मानसिक छळ करत होते, असेही पालवे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
गौरीने शेवटचा कॉल अनंतला केला
शनिवारी रात्री डॉ. गौरी यांनी पती अनंत गर्जे यांना फोन करून, "मी आत्महत्या करत आहे" असे कळवले. त्यावेळी अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्यासोबत एका राजकीय दौऱ्यावर होते. माहिती मिळताच त्यांनी तातडीने दौरा रद्द करून वरळीतील घर गाठले, परंतु तोपर्यंत डॉ. गौरी यांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने आणि भाजप नेत्याच्या पीएवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
