आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळ असलेल्या पुई गावाजवळ हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडून कोकणाकडे जाणारी एक खासगी कार अत्यंत वेगाने जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरील एका अवजड कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चुराडा होऊन वाहनाचे सुट्टे भाग सर्वत्र उडाले.
advertisement
या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. कारमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने कोलाड येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कारचा पुढचा भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसला होता, ज्यामुळे जखमींना आणि मृतांना बाहेर काढणं कठीण होतं.
रेस्क्यू टीमची मदत
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक कटरचा वापर करावा लागला. अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आणि बचावकार्य करण्यासाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलट घटनास्थळी दाखल झाले होते.
