दोन्ही 'राष्ट्रवादी' आता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी!
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट कार्यरत होते. अजित पवार गट आधीच सत्तेसोबत होता, मात्र शरद पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आता रावराणे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने, मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गट आता शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता एकूण ४ नगरसेवकांचे अतिरिक्त बळ जमा झाले आहे. भाजपसोबतच्या वाटाघाटी करताना शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढणार आहे.
advertisement
निधी आणि विकासासाठी महायुतीला पाठिंबा...
आपल्या या अनपेक्षित निर्णयाचे स्पष्टीकरण देताना अजित रावराणे म्हणाले की, "प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळवणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे माझे प्राधान्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाबाबत दिलेले आश्वासन आणि प्रभागाच्या निधीसाठी मी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे."
ठाकरेंसाठी मोठा धक्का...
निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणाऱ्या ठाकरेंसाठी हा निर्णय चिंताजनक मानला जात आहे. शरद पवारांचा मुंबईत असलेला हा एकमेव 'मोहरा' आता शिंदेंच्या गोटात गेल्याने महापालिकेतील विरोधी पक्षाची ताकद कमी झाली आहे. महापौर निवडणुकीत ठाकरे गटाकडून काँग्रेसला सोबत घेऊन विरोधकांचे संख्याबळ दाखवण्याचे प्रयत्न होते. मात्र, शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाने महायुतीला पाठिंब्याचा निर्णय जाहीर केल्याने मोठा उलटफेर झाला आहे.
