विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरभरून मतांचे दान दिले. एकूण मतदानाच्या तब्बल 48 टक्क्याहून अधिक मतदारांनी महायुतीला साथ दिली. विशेष म्हणजे यावेळी केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम मतदारांचाही पाठिंबा महायुतीला मिळाल्याचं समोर आलंय.
महाराष्ट्रात 20 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसघांची संख्या 38 एवढी आहेत. यातील तब्बल 23 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीनं विजय मिळवला आहे, तर केवळ 14 मतदारसंघातच महाविकास आघाडीला यश मिळवता आलं आहे. अवघ्या एका मतदारसंघात एमआयएमला विजय मिळवता आला, तिथेही महायुतीचा उमेदवार नव्हता.
advertisement
उत्तर प्रदेश-आसाममध्येही भाजपला मतं
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासातील सुटची योजना आणि इतर महिला केंद्रीत योजनांचा परिणाम म्हणून अगदी उघडपणे मुस्लिम महिलांना महायुतीला साथ दिल्याचं स्पष्ट झालंय. बरं हे महाराष्ट्रातच घडलं असं नाही. उत्तर भारतातही काही विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुस्लिम मतदारसंघात भाजप आणि एनडीएनं यश मिळवलं आहे. भाजपानं उत्तर प्रदेशच्या कुंदरकी आणि मीरापूरच्या जागेसह आसामच्या सामागुडी या तिन्ही मुस्लिम बहुल मतदारसंघात विजय मिळवला.
आसामच्या सामागुडीत 46 टक्के मुस्लिम मतदार आहे, असं असतानाही इथे भाजपचे दीपलू रंजना सरमा विजयी झाले. त्यांनी मागील 25 वर्षापासून आमदार असलेल्या काँग्रेसच्या रकीबुल हसन यांचे चिरंजिव तंजिल हुसैन यांचा इथे पराभव केला. आसाममधील महिलांसंदर्भातील योजनांचा परिणाम म्हणून मुस्लिम महिलांची मतं भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजुनं वळाल्याचं समोर आलंय.
निवडणुका म्हटल्या म्हणजे मुस्लिम संघटनांची पत्रकं निघणं, ठराविक पक्ष आणि आघाड्यांना मतदानाचे फतवे निघणं हे सारं या निवडणुकीतही घडलं. ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींनी तर यावेळी अगदी उघडपणे महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फर्मान काढलेले. पण, असं असतानाही मुस्लिम महिलांनी महायुती आणि भाजपला कौल दिला, त्यामुळेच आता बदलेल्या राजकारणात मुस्लिम मतदारही विकासाभिमूख राजकारणाला पसंती देत असल्याचं समोर येतंय.
