राज्यसभेच्या ३७ जागांसाठी महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये १६ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या सात जागांसाठीची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. भारतीय जनता पक्षाकडून आपल्या चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आघाडीकडून शरद पवार यांचे नाव अंतिम झाले नाही तर भारतीय जनता पक्ष पाचव्या उमेदवाराला देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे करू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
advertisement
शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव वारंवार पुढे करीत होते. परंतु आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेनाच ही जागा लढवेल, असे ठामपणे सांगितले. जयंत पाटील-सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतरही आम्ही कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केले नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठासून सांगितले. देशभरात शिवसेनेचा आवाज पोहोचविण्यासाठी आम्हाला ही जागा महत्त्वाची आहे, असे सांगून एकप्रकारे शरद पवार यांच्या नावाला शिवसेनेची असहमती होती. हेच ओळखून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. ज्या शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवले, त्याच शरद पवार यांनी राज्यसभेत जाऊ नये, यासाठी शिवसेना विरोध करते आहे, असा प्रचार भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाला. तसेच आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार हे उमेदवार नसतील तर निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे संकेतही भाजपने दिले.
राज्यसभा निवडणूक २०२२ ला आघाडीचा करेक्ट कार्यक्रम झाला होता, पुनरावृत्ती नको म्हणून आघाडीकडून पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
राज्यसभा निवडणूक २०२२ साली भारतीय जनता पक्षाने आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करून एक अतिरिक्त उमेदवार देऊन निवडून आणला होता. याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपचे राजकारण विचारात घेऊन आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीने सातव्या जागेबद्दल अधिक धोका न पत्करता शरद पवार यांनाच राज्यसभेवर पाठवावे, यावर ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाल्याचे कळते.
