ज्या महाविद्यालयांचं आतापर्यंत 'नॅक' मूल्यांकन झालेलं नाही, अशा महाविद्यालयांना प्राथमिक स्तरावर समिती प्रथम भेटी देणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचं प्रशासकीय आणि शैक्षणिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाविद्यालयांकडून अर्जही मागवले होते. 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकूण 439 महाविद्यालयांनी प्रशासकीय आणि शैक्षणिक ऑडिटसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
advertisement
विद्यापिठाने दिलेल्या माहितीनुसार, 19 महाविद्यालयांचे अर्ज अद्याप अपूर्ण स्थितीत आहेत. ज्या महाविद्यालयांची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया झाली आहे, त्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे. नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांना प्राथमिक स्तरावर एक समिती भेटी देणार आहे. विद्यापीठाने 'नॅक' ऑडिट झालेल्या 153 महाविद्यालयांची यादी देखील जाहीर केली आहे.
नॅक म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही केंद्र सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता तपासली जाते. 1994 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार या संस्थेची स्थापना झालेली आहे.