छत्रपती संभाजीनगर: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल आहे. पण याा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सगे-सोयऱ्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचं दिसतंय. कुणी पत्नीला, कुणी मुलाला, कुणी पुतण्याला, तर कुणी वहिनीला निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. काही आमदार आणि माजी आमदारांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरविले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात नगराध्यक्ष व नगरसेवक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर घराणेशाहीला पहिला मान दिला गेला आहे. सिल्लोडमध्ये आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी चिरंजीव समीर सत्तार यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवलं आहे. तर वैजापुरात शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे रिंगणात आहे.
पैठणमध्ये माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष अनिल घोडके हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत.
गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील यांचे चिरंजीव ऋषीकेश हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. तर आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद दुर्राणी यांनी पाथरीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळे यांनी जिंतूरमध्ये अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे, माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा मुलगा संदीप लहाने यांनी शिंदेसेनेकडून सेलूमध्ये नगरसेवक पदासाठी अर्ज भरले.
जालन्यातील परतूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा विमलताई जेथलिया यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्वल कुचे रिंगणात आहे. तर माजी आमदार दिवंगत भालचंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्य देवयानी कुलकर्णी यांना अध्यक्षपदासाठी आणि केदार कुलकर्णी, सविता कुलकर्णी यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली.
माजी आमदार विलासराव खरात यांचे चिरंजीव विश्वजीत खरात यांना भाजपच्या वतीने नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगोली येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वतीने आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखाताई श्रीराम बांगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बीडमध्ये सासरेबुवा मैदानात
आमदार बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर यांनी देखील नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बीडच्या गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजई गीता पवार यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली आहे. अंबाजोगाईत भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुदंडा यांनी शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी तथा गंगाखेडचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी उर्मिला केंद्रे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून गंगाखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी भरली.
सोनपेठमध्ये आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत यांच्या पत्नी सारिका भोसले यांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी भरली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नगरपरिषद-नगरपंचायत नगराध्यक्ष उमेदवार यादी
पैठण नगरपरिषद
मोहिनी लोळगे : भाजप (माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या पत्नी)
अपर्णा गोर्डे : शिवसेना ठाकरे गट (माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे यांच्या पत्नी)
सुदैवी योगेश जोशी : काँग्रेस (माजी नगराध्यक्ष सोमनाथराव जोशी यांच्या सूनबाई)
विद्या कावसानकर : शिवसेना शिंदे गट (माजी नगरसेवक भूषण कावसानकर यांच्या पत्नी)
सिल्लोड नगरपरिषद
अब्दुल समीर अब्दुल सत्तार : शिवसेना शिंदे गट
मनोज मोरेल्लू : भाजप
दीपक घोरमोडे,लखन सोनवणे, मॅचिंदर धाडगे : शिवसेना ठाकरे गट (तिघांना बी फॉर्म दिल्याचा दावा)
गंगापूर नगरपरिषद
प्रदीप पाटील : भाजप
अविनाश पाटील : शिवसेना ठाकरे गट
ऋषिकेश पाटील : शिवसेना शिंदे गट
संजय जाधव : राष्ट्रवादी अजित पवार गट
वैजापूर नगरपरिषद
दिनेश परदेशी : भाजप
संजय बोरनारे : शिवसेना शिंदे गट
खुलताबाद नगरपरिषद
परसराम बारगळ : भाजप
बाबासाहेब बारगळ : शिवसेना शिंदे गट
सय्यद आमेर पटेल : काँग्रेस
हाजी अकबर बेग : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
कन्नड नगरपरिषद
स्वाती कोल्हे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शेख फरीन बेगम : काँग्रेस
अनिता कवडे : शिवसेना शिंदे गट
फुलंब्री नगरपंचायत
सुहास सिरसाट : भाजप
राजेंद्र ठोंबरे : शिवसेना ठाकरे गट
मुद्दस्सर पटेल : काँग्रेस
आनंदा ढोके :शिवसेना शिंदे गट
