गस्तीवर असताना पाचपावली पोलिस पथकाला खैरीपुरा भागात काही लोक संशयास्पदरित्या बसल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी तातडीने पाठलाग करून शुभम मेश्राम, शिवम खोते आणि अभिषेक पराते या तिघांना ताब्यात घेतलं. त्याचवेळी दोन आरोपी फरार झाले होते. नंतर पोलिसांनी त्या दोघांनाही शोधून अटक केली.
advertisement
या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून चार चाकू, लोखंडी कुन्हाड, लोखंडी टॉमी, कोयता, नायलॉनची दोरी आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे. याशिवाय तिघा आरोपींच्या वापरातील तीन दुचाक्याही पोलिसांनी हस्तगत केल्या. जप्त शस्त्रास्त्र आणि वाहनांमुळे आरोपी मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस तपासात हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले. यापूर्वीही त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर पाचपावली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा घडण्याआधीच उधळून लावण्यात आला.