शोकाकुल वातावरण अन् अंत्यविधीची तयारी
गंगाबाई साखरे या गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती क्षीण झाली होती. सोमवारी अचानक त्यांची हालचाल बंद झाली आणि श्वास थांबल्यासारखा वाटला. घरच्यांनी त्या गेल्याचं समजून हंबरडा फोडला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लांबचे नातेवाईकही अंत्यविधीसाठी गोळा झाले. परंपरेनुसार अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पायाचे अंगठे बांधले गेले, नाकात कापूस घातला आणि काही वेळातच अंत्ययात्रा निघणार होती.
advertisement
पायाचं बोट हललं अन्
सगळेजण शेवटचं दर्शन घेत असताना अचानक एका नातेवाईकाचं लक्ष गंगाबाईंच्या पायाकडे गेलं. त्यांच्या पायाचं बोट हलत होतं! सुरुवातीला भास वाटला, पण थोड्याच वेळात गंगाबाईंनी डोळे उघडले आणि श्वास घेऊ लागल्या. नाकातला कापूस काढला आणि आज्जी जिवंत असल्याचं लक्षात येताच, जिथे काही वेळापूर्वी रडण्याचे आवाज येत होते, तिथे आनंदाने जल्लोष सुरू झाला.
ज्या दिवशी 'सरण' रचलं, त्याच दिवशी कापला 'केक'
योगायोग म्हणजे १३ जानेवारी हा गंगाबाईंचा वाढदिवस होता. ज्या दिवशी त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती, त्याच दिवशी त्या १०३ वर्षे पूर्ण करून १०४ व्या वर्षात पदार्पण करत होत्या. आज्जी जिवंत झाल्याचा आनंद इतका मोठा होता की, अंत्यविधीसाठी जमलेल्या सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन आज्जीचा वाढदिवस साजरा केला. हातात हार घेण्याऐवजी आज्जीच्या हातून केक कापण्यात आला.
चारगाव परिसरात सध्या या घटनेची मोठी चर्चा आहे. मृत्यूलाही हरवून परतणाऱ्या या जिद्दी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. दोन वर्षांपासून आजारी असलेल्या गंगाबाई आता शुद्धीत असून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.
