विधानभवनाच्या दिशेने काँग्रेसचा मोर्चा
भाजपच्या आमदारांनी मुंढेंवर कारवाई करण्याची मागणी लावून धरल्यानंतर, आता काँग्रेसकडून त्यांना पाठिंबा देण्यासाठी थेट विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामुळे अधिवेशनातील वातावरण अधिक तापले आहे. विधानभवनात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडून अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर काही आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मुंढे यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला आहे.
advertisement
भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची लक्षवेधी
काँग्रेस नेते बंटी शेळके या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. मुंढे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असून, हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आंदोलनाद्वारे या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
'डरो मत, वॉक फॉर तुकाराम'
भाजपच्या आमदारांनी तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली असली, तरी नागपुरात आज त्यांच्या समर्थनार्थ काढलेल्या या मोर्चाला 'डरो मत, वॉक फॉर तुकाराम' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. हा मोर्चा मध्य नागपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशवंत स्टेडियम ते टेकडी रोड असा मोर्चा मार्गस्थ केला आहे. विशेष म्हणजे मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यासोबत मिळून तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता आमने-सामने झाला आहे.
