नागपूर : नागपूरच्या त्रीमुर्ती नगर परिसरात असलेल्या उर्वशी बारमध्ये शुक्रवारी रात्री तोडफोडीची धक्कादायक घटना घडली. बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने हाणामारीत रुपांर झाले. आरोपींनी बारमध्ये पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने तोडफोड करत 25 हजार रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून प्रतापनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहिती अनुसार, रात्रीच्या सुमारास काही तरुण उर्वशी बारमध्ये आले होते. त्या वेळी बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे वेटरने सांगितल्याने आरोपी संतापले. वेटरसोबत प्रथम शाब्दिक वाद झाला आणि पाहता पाहता त्यांनी धारदार शस्त्र काढून बारमधील काउंटर, काचेच्या वस्तू आणि फर्निचरची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बारमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बारच्या काउंटरमधील अंदाजे 25 हजार रुपये रोख रक्कम लुटली
तोडफोडीच्या दरम्यान आरोपींनी बारच्या काउंटरमधील अंदाजे 25 हजार रुपये रोख रक्कम लुटल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, हल्ल्यात वेटरला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने, इतर कुणालाही मोठी दुखापत झालेली नाही.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू झाला असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार बसण्याच्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिसरात तणावाचे वातावरण निर्माण
या घटनेमुळे त्रीमुर्ती नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे या भागात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास प्रतापनगर पोलीस करत आहेत
