प्रसाधनगृहातील हालचालींनी फुटलं भांडं
हे संपूर्ण प्रकरण नागपूरच्या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर उघडकीस आले. गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना, एक विद्यार्थिनी वारंवार वॉशरूम जात होती. तिच्या या संशयास्पद हालचालींमुळे तिथल्या पर्यवेक्षकांना संशय आला. त्यांनी महिला शिक्षिकेमार्फत तिची झडती घेतली असता, तिच्याकडे एक स्मार्टफोन सापडला. जेव्हा हा मोबाईल तपासला गेला, तेव्हा उपस्थित सर्वांचेच पाय लटपटायला लागले. त्या मोबाईलमध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच संपूर्ण पेपर आलेला होता.
advertisement
१५ विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि पैशांचा खेळ
पोलीस तपासात समोर आले की, मोबाईलमध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. पकडल्या गेलेल्या विद्यार्थिनीची अधिक चौकशी केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली. शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने पैसे घेऊन हा पेपर फोडला होता. विशेष म्हणजे, या ग्रुपमधील इतर १३ विद्यार्थी शहराच्या वेगवेगळ्या केंद्रांवर आरामात पेपर सोडवत होते.
पोलिसांची कारवाई आणि गुन्ह्याची नोंद
केंद्रप्रमुखांनी तातडीने सदर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून, त्या शिक्षकाचा आणि पेपर लीक झालेल्या साखळीचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बोर्डाच्या गोपनीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
